मुंबई : ‘बहनों और भाईयो आप सुन रहे है…’ भारदस्त आवाजातील ही वाक्ये आता रेडिओच्या श्रोत्यांना कधीच ऐकता येणार नाहीत. रेडिओ, विविध भारतीवरील लोकप्रिय अनाऊंसर, निवेदक, रेडिओ किंग, टॉक शो होस्ट अशा अनेक उपाधींनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
अमीन सयानी यांना बुधवारी सकाळी सहा वाजता हद्यविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने एच. आर. रिलायन्स फाऊंडेशन येथे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सयानी यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांच्या जाण्याने रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सयानी यांच्यावर २२ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.
सयानी यांना उच्च रक्तदाब आणि अन्य शारीरिक व्याधींनी ग्रासले होते. गेल्या १२ वर्षांपासून त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होता. त्यामुळे चालताना वॉकरचा आधार घ्यावा लागत होता. रेडिओ सिलोन आणि विविध भारती चॅनलवरील ‘बिनाका गीतमाला’ या त्यांच्या कार्यक्रमाने तेव्हाचे लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढले होते. प्रत्येक आठवड्याला रेडिओप्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आसुसलेले असायचे.
अमीन सयानी यांनी जवळपास १९ हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये झाली होती. रेडिओवर १९५२ साली सुरु झालेल्या ‘गीतमाला’ या कार्यक्रमाने अमीन सयानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी होती की, रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास ६५ हजार पत्रं यायची. या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त ७ गाणी होती. ही संख्या नंतर १६ पर्यंत वाढवण्यात आली. त्यावेळी अमीन सयानी दिवसाला १२ तास काम करायचे. त्या दिवसांची आठवण सांगताना अमीन सयानी यांच्या मुलाने सांगितले की, रविवार सोडून मला वडील कधीच भेटायचे नाहीत. ते त्यांच्या स्टुडिओमध्ये कामात असायचे.
अमिताभ बच्चन यांना केलेलं रिजेक्ट
४० ते ४५ वर्षांपूर्वी मुंबईतील रेडिओ स्टूडिओमध्ये बिग बी ऑडिशन देण्यासाठी पोहोचले होते. पण अमिताभ बच्चन त्यांच्या भेटीची वेळ न घेताच त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. त्यामुळेच सयानी यांनी बिग बींना भेटण्यास नकार दिला होता आणि बिग बींचा आवाज न ऐकताच त्यांना रिजेक्ट केले होते.