अंबरनाथ : अंबरनाथमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केली होती. पोलिसांनी याप्रकरणाचा ८ दिवसांत माग काढत अखेर वाराणसीहून आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुलीचा नीट सांभाळ करत नसल्याने पत्नीशी वाद झाला होता त्यातूनच पतीने पत्नीची हत्या केल्याचा उलगडा यानंतर झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे आणि त्याची पत्नी रूपाली लोंढे हे एक वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होते. रूपाली ही मुलीचा सांभाळ नीट करत नसल्यामुळे विकीचे आपल्या पत्नीशी सारखेच वाद होत असत.
त्यातच ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला, हा वाद टोकाला जाऊन पोहचला . यामध्ये विकीने पट्ट्याने रूपालीचा गळा आवळला आणि धारदार चाकूने तिचा गळा चिरून तिची हत्या केली. यानंतर विकी हा थेट उत्तर प्रदेशात पळून गेला. त्याचा मार्ग काढत असतानाच तो उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख, भागवत सौंदाणे, कैलास पादीर हे तिघे तातडीने वाराणसीला रवाना झाले. तिथे स्थानिकांच्या वेशभूषेत सापळा रचून या तिघांनी विकीवर झडप घालत त्याला ताब्यात घेतलं आहे.
तिथून त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणून गुरुवारी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे देखील उपस्थित होते.