कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या ऐतिहासिक फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. अजित पवार यांच्या गटाने आज कर्जतमध्ये राज्यव्यापी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात बोलताना अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाची पाठराखण करत राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल अनेक खळबळजनक दावे केले आहेत. तसंच अजित पवार यांच्यावर होणाऱ्या आरोपांना आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, “भारतीय जनता पक्षासोबत सरकारमध्ये सहभागी होऊन आम्ही काहीतरी महापाप केल्याचा आरोप होत आहे. मात्र, शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची एक बैठक झाली होती. या बैठकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्षांसह सर्व आमदारांनी सह्या करून भाजपबरोबरच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी एक निवेदन तयार केलं होतं. यामध्ये शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेचे एकमेव नेते म्हणवून घेणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील एका नेत्याचाही समावेश होता. त्यावेळी एक समिती स्थापन करून भाजपसोबत युतीच्या चर्चेसाठी आम्हाला आमच्या केंद्रीय नेतृत्वाकडून परवानगी देण्यात आली होती. पण, नंतर तो निर्णय बदलण्यात आला,” असा गौप्यस्फोट खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे.
२०१६-१७ मध्ये देखील असा प्रयत्न’ झाला होता. भाजपसोबत युती करण्यासाठी याआधी अनेक प्रयत्न झाल्याचे सांगताना तटकरे म्हणाले की, “२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे पूर्ण निकाल हाती येण्याआधीच मी प्रदेशाध्यक्ष असल्याने मला आणि प्रफुल्ल पटेल यांना आमच्या नेतृत्वाने सूचना दिली की, भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर करा. भारतीय जनता पक्षाने न मागताही आम्ही त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर शरद पवारांनी सांगितल्यानुसार मी अलिबागला पक्षाचं एक शिबीर बोलावले. त्या शिबिरातही भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली. २०१६ मध्ये आम्हाला पुन्हा सांगण्यात आलं की. आपल्याला भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यावेळी लोकसभेचं जागावाटप, मंत्रिपदांचं वाटपही ठरलं होतं. मात्र, शेवटच्या क्षणी काही घडामोडी घडल्या आणि आपण सरकारमध्ये सहभागी होऊ शकलो नाही,” असा दावा तटकरेंनी केला आहे.
तसेच ‘आरोप झाल्यानंतर पक्ष पाठीशी उभा राहिला नाही’ “आघाडी सरकारमध्ये मी, अजित दादा आणि छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. मात्र, त्या काळात पक्ष आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला नाही. एकच गोष्ट १०० वेळा सांगितल्याने लोकांनाही ती खरी वाटू लागली,” अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी शरद पवारांबद्दल अप्रत्यक्षरित्या नाराजी बोलून दाखवली आहे.