Navi Mumbai : नवी मुंबईत एकाच दिवशी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभ्यासातील तणावामुळे दोन्ही विद्यार्थ्यांनी हे टोकाचं पाऊस उचलल्याचं सांगितल जात आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. पृथ्वी ढवळे (वय १४ वर्ष) आणि दर्शील पाटील (वय १५ वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या मुलांची नावे आहेत. एकाने तलावात उडी मारून तर दुसऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
नेरुळ आणि करावे गाव याठिकाणी या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पालक आणि विध्यार्थ्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शाळेतील अभ्यास कठीण जात असल्याने दोन्ही विद्यार्थ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दर्शील पाटील हा अल्पवयीन विद्यार्थी करावे परिसरात राहत होता. दर्शील पाटीलच्या वडिलांचं वर्षभरापूर्वीचं निधन झालं आहे. वडिलांच्या निधनानंतर त्याची आई दर्शील आणि त्याच्या लहान बहिणीचे संगोपन करत आहे. यामुळे दर्शीलवर आईची अपेक्षा होती.
मात्र अभ्यास जड जात असल्याने आपण आईच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही असे सतत त्याला वाटायचे. यामुळे तो चिंतेत असायचा. अखेर रविवारी मध्यरात्री त्याने आपण आत्महत्या करत असल्याचा मॅसेज बहिणीसह कुटुंबियांना पाठवला होता. माझ्यावर अभ्यासाचा तणाव असून आपण कुटुंबियांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, असा मॅसेज पाठवत त्याने तलावात उडी घेतली.
दुसरीकडे नेरूळ येथे राहणाऱ्या १४ वर्षाय पृथ्वी ढवळे याने देखील टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली . घरात कुणी नसल्याचं पाहून पृथ्वीने बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. अभ्यास कठीण जात होता असे पोलिस तपासात समोर आलं आहे. अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या दोन्ही घटनांनी शहरात पालक वर्गांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.