Suicide News: कल्याण : कल्याण पूर्व परिसरात 17 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. संबंधित मुलगी एका नामांकित महाविद्यालयात 12 वी कॉमर्समध्ये शिक्षण घेत होती. सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीला परीक्षेत अपयश येईल अशी भीती वाटत होती. आपण उत्तीर्ण होणार नाही, या विचारामुळे ती मानसिक तणावाखाली होती. या ताणातूनच तिने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्येपूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. “मी गेल्यावर आई-बाबांनी त्रास करून घेऊ नका,” असे तिने लिहिले असल्याचे समजते.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांवर वाढणारा ताण आणि अपेक्षांचे ओझे हा गंभीर विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीही भीतीमुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे तरुणांमध्ये वाढत असलेल्या मानसिक तणावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना केवळ परीक्षेच्या भीतीतून घडली की इतर काही कारण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांनी तणाव आल्यास पालक आणि शिक्षकांशी संवाद साधावा, असे आवाहनही केले जात आहे.







