उल्हासनगर (ठाणे) : देशात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. त्याविरोधात देशभरात आंदोलनं सुद्धा सुरु आहेत. मात्र, अजूनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी होत नाही आहे. अशातच आता उल्हासनगर शहरातील एका नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांनी एका सात वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील एका पि.टी. च्या शिक्षकाने वर्गातील सात वर्षाच्या मुलीला ‘मला मिठी मार, माझी पप्पी घे नाहीतर तुला मारेल…’ असं बोलत धमकावले. त्यानंतर या अल्पवयीन मुलीच्या गालावर चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला. या घडल्या प्रकरणी पीडित मुलीने पोलीसांकडे तक्रार नोंदवली.
त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पि.टी. शिक्षकाला अटक केली. शिक्षकाने केलेल्या या किसळवाण्या प्रकाराविषयी शाळा वर्गांतून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.