मुंबई : बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बबन गीते यांनी अनेक बोगस बुथ शोधले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही गीते बीडमध्ये विरोधकांसाठी अडचण ठरू शकते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी बबन गीते यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
तसेच पुढे बोलताना म्हणाले, बबन गीते यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भक्कमपणे उभा आहे. माझ्या माहितीनुसार ज्यावेळी घटना घडली त्यावेळी बबन गीते जागेवर उपस्थित नव्हता, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
नागपूरमध्ये एका शाळेने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सफर घडवल्याच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मी सातत्याने सांगत होतो की, मनुस्मृती अभ्यासक्रमात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आता शाळेच्या मुलांना घेऊन संघ कार्यालयात जाणं, याचं प्रतीक आहे. मुलांना संघ माहिती करून देता मग बुद्ध, शिवशाहू, फुले आंबेडकर देखील माहिती करून द्या, असंही आव्हाड यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, शिवाजीराव गर्जे यांनी गद्दारी केली होती, त्याचं गिफ्ट त्यांना मिळालं. कारण त्यांनी ज्यावेळी पक्ष दुभंगला त्यावेळी शिवाजीराव गर्जे यांनी कागदपत्रं चोरी केली होती, असंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.