मुंबई: विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाने काँग्रेसबरोबरच शिवसेनेतही (ठाकरे) महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत विचार सुरू झाला असून शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी येत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकत्र यावे, अशी मागणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत सुरू झाल्याने येत्या काळात महाराष्ट्रात राजकीय घडामोडींची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी शिवसेना भवनात झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत याबाबत सखोल चर्चा जाळायची माहिती समोर येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात शिवसेनेचे वर्चस्व आहे. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेचा झेंडा महापालिकेवर फडकत आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत सेनेला ८४ जागा जिंकता आल्या. भाजपने ८२ जागांवर मुंसडी मारली होती, तरीही अपक्ष आणि मनसेच्या ६ नगरसेवकांना बरोबर घेऊन शिवसेनेने पाच वर्षे सत्ता राखली. आता शिवसेनेतील फुटीनंतर येत्या महापालिका निवडणुकीसाठी सज्ज होताना उद्धव ठाकरे यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. पक्ष आणि चिन्हाचा निर्णय न्यायप्रविष्ट असताना ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी ‘मशाल’ ऐवजी ‘धनुष्यबाणा’ला भरभरून मते दिली. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पारडे जड झाले, असा शिवसैनिकांचा सूर आहे.
मुंबईत शिवसेनेने १० जागा सर केल्या असल्या, तरी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे यश कमीच आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या. शिवसेनेसह मित्रपक्षाला त्याचा फायदा झाला. काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले. विधानसभेत मात्र महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे यांचा करिष्मा कायम राहील का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. महापालिकांच्या निवडणुकीवेळी विधानसभेसारखे चित्र राहिले, तर शिवसेनेच्या (ठाकरे) हातून महापालिका निसटण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत राहिल्यामुळेच या निवडणुकीत ठाकरे यांना फटका बसला.
लोकसभेप्रमाणे मतदारांनी साथ दिली नाही. महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना महाविकास आघाडी म्हणून मतदारांसमोर गेल्यास त्याचा अधिक फटका बसू शकतो. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडी म्हणून निवडणूक लढवायची का, याबाबत शिवसेनेत पुनर्विचार सुरू झाला आहे. लवकरच याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.