मुंबई : कुणबी नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या, अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली होती. या मागणीनुसार, सग्यासोयऱ्यांबाबत आजच (ता. २६) जानेवारी) निर्णय होण्याची शक्यता आहे. सगेसोयऱ्यांच्या नोंदी करण्यासंदर्भातील अद्यादेश काढला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारकडून नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. हा नवीन अध्यादेश लवकरच जरांगे यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.
या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड विशेष विमानाने मनोज पाटील जरांगे यांना जीआर संदर्भात बोलण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त आर्दड आणि भांगे पोहोचतील.
काय आहेत मनोज जरांगे यांच्या मागण्या?
– नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या.
– शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या.
– कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा.
– जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
– आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा.
– आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे घ्या.
– SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या.
– वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.
– रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही.