मुंबई: मुंबईतील घाटकोपर परिसरात सुनेच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. 35 वर्षीय सपना गंजी यांचा मृत्यू सुरुवातीला बाथरूममध्ये पाय घसरून झाला असून अपघात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांना मृतदेहाची पाहणी करताना काही संशयास्पद खुणा दिसून आल्याने तपासाची दिशा बदलली. या प्रकरणात पंतनगर पोलिसांनी सासूसह 5 जणांना अटक केली आहे.

सपना या आपल्या मुलासोबत काही काळ दुबईत होत्या. सुमारे महिनाभरापूर्वी त्या मुंबईत परतल्या होत्या. 16 ऑगस्ट रोजी त्या घरात असताना त्यांचा मृत्यू झाला. सासरच्या मंडळींकडून बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सासू धनलक्ष्मीने सपना यांच्यावर दारूचे व्यसन असल्याचा तसेच विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता.

मृतदेहाची तपासणी करताना पोलिसांना सपना यांच्या गळ्याभोवती काळे-निळे व्रण तसेच डोक्याच्या बाजूला दुखापत आणि रक्तस्राव दिसून आला. त्यामुळे हा अपघात नसून हत्या असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानंतर तपास सुरू करत पोलिसांनी अधिक तपास केला. 2024 मध्ये सपना यांनी सासरच्या मंडळींविरोधात नालासोपारा पोलिसांत कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. या जुन्या वादातून निर्माण झालेला राग मनात ठेवून धनलक्ष्मीने सुनेच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, सपना घरात एकट्या असताना काही आरोपी घरात गेले. त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर मृत्यू हा अपघात असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रकरणातील मुख्य आरोपी सासू धनलक्ष्मी गंजी (60) असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिच्यासह माजी मोलकरीण मंगलाबाई जाधव (45), शिवानी जाधव (21), सुरेश जाधव (46) आणि साजन जाधव (19) यांना अटक करण्यात आली आहे. माजी मोलकरीण मंगलाबाई यांना ३ लाख रुपयांचे आमिष दाखवून सुनेची हत्या करण्यात आली आहे. जुन्या कौटुंबिक वादातून आणि रागातून हा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







