मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पिंपरी चिंचवडमधील विश्वासू सहकारी महापौर संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित वाघेरे यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईत ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. “उद्धव ठाकरे यांचे मी आभार मानतो. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिवसेनेत प्रवेश दिला. आपण उद्धव ठाकरे यांच्यामुळेच कोरोनाच्या साथीमध्ये महाराष्ट्र मध्ये कोरोनाला रोखू शकलो. त्यांनी उत्तम प्रकारे राज्याला मार्गदर्शन केलं”, असे संजोग वाघेरे म्हणाले. वाघेरे यांच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ’50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, मला आता मावळमध्ये प्रचाराला यायची गरजच नाही, आजच मावळमध्ये भगवा फडकला. “मला भेटल्यावर तुम्ही भावूक झालात असं म्हणालात, मला भावूक आणि घाऊक याचा फरक कळायला लागला आहे. काहीजण भावूक आहे, जे भावनेला महत्त्व देतात, ज्यांच्यात संवेदना आहेत, ते निष्ठेनं भगव्यासोबत आहेत. काहीजण घाऊक आहेत, त्यांना आता खोक्यामध्ये बंद करायची वेळ आली आहे. तसं बघायला गेलं तर मावळ मतदारसंघ जेव्हापासून निर्माण झाला, तेव्हापासूनच शिवसेना जिंकत आली आहे. सुरुवातीला बाबर होते. त्यानंतर मी शब्द दिला होता, म्हणून जे आता गद्दार झालेत, त्यांना उमेदवारी दिली. म्हणजे, त्यावेळी असं काही नव्हतं की, शिवसेनेकडे उमेदवार नव्हता. आता त्यांनी गद्दारी केली, गद्दार आणि स्वाभिमानी हा संजोग आणि त्या गद्दारांमध्ये आहे. फरक एकदम स्वच्छ आहे. आज तुम्ही सर्वजण शिवसेनेत आलात, काय असं शिवसेनेमध्ये आहे आता की तुम्ही येताय? सत्ता जी होती, ती पुन्हा येणारच आहे, त्याबाबत दुमत नाही. पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली, गद्दारी केली.”