Covid Scam Mumbai: मुंबई : कोरोना काळात मुंबईतील ऑक्सिजन जनरेशन प्लांट गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गु्न्हे शाखेने आज मोठी कारवाई केली आहे. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रमुख रोमिन छेडा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने रोमिन छेडा यांची गुरुवारी सलग आठ तास चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. रोमिन छेडा यांचे संबंध शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री नागपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. छेडा हे हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक असून या कंपनीला कोविडच्य काळात ऑक्सिजन प्लांट संबंधित कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. या सर्व प्रकरणात गैरप्रकार आढळल्याने आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करत गुन्हा दाखल केला. आज पुन्हा चौकशी करण्यात आल्यानंतर रोमिन छेडाला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. (Covid Scam Mumbai)
मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’मधील माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, बी डी बी ए रुग्णालय, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन रुग्णालयात 30 दिवसांत ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट रोमिन छेडा यांच्याशी संबंधित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते.
हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी ही उत्तर प्रदेश राज्यातील कंपनी आहे. कोणताही अनुभव नसताना आणि नियमांमध्ये बसत नसताना त्यांनी हे कंत्राट मिळवले. तसेच दिलेल्या 30 दिवसांच्या मुदती पेक्षा जास्त विलंबाने ऑक्सिजन प्लांट मुंबई महापालिकेला सुपूर्द केले. पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी छेडा यांच्याशी संगनमताने ते कंत्राट तर या कंपनीला दिलेच, पण प्लांट उभारणीला विलंब झाल्याने दंड देखील कमी आकारला. यामुळे पालिकेचे 6 कोटी रुपयांचे नुकसान झाले.