मुंबई : कल्याणमधील मोहने परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका रिक्षा चालकानं सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्याने आपल्या खिशात ठेवलेल्या मन सुन्न करणाऱ्या चिट्ठीने आत्महत्येच रहस्य उलगडलं आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय जीवन मोरे असं आत्महत्या केलेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे..मुलांच्या शिक्षणाची फी भरण्याकरता घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्यामुळे सावकाराच्या जाचाला कंटाळून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारा सचिन दळवी आणि त्याच्यासोबतची एक अनोळखी महिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या संदर्भात मृत विजय मोरे यांचा मोठा भाऊ राजू जीवन मोरे (५२) यांनी दिलेल्या जबानीवरून खडकपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील तक्रारदार राजू मोरे हे देखील रिक्षाचालक असून ते विजय मोरे कुटुंबियांच्या घरा शेजारीच राहतात. विजय मोरे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत.
मन सुन्न करणारी सुसाईड नोट?
मी विजय मोरे, मी माझ्या मनाने आत्महत्या करतो की, माझ्यावर कर्जदाराकडून खूप छळ केला जातो. त्यामुळे माझ्या घरात उपासमारीची बारी आली आहे. माझ्या घरच्यांचा काही गुन्हा नाही. त्यांना दोषी ठरू नये. दोषी ठरवावे ते कर्जदरांना, त्याच्यामुळे आत्महत्या करतो. माझी बायको खूप चांगली आहे. तिला सांगणे आहे की माझ्याकडून खूप मोठा अपराध होतोय माला माफ कर, मुलांना चांगलं सांभाळ, मी मेल्यावर सदैव तुझ्या पाठीशी राहील. माझा मुलगा यश व माझी मुलगी प्रांजला मला माफ करा. चांगले राहा, खूप अभ्यास करा व खूप मोठे व्हा, मी सदैव तुमच्या पाठीशी राहील, मला माफ करा आपला विश्वासू – विजय मोरे