मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. संपामुळे वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईतील निवासी डॉक्टरांनी राज्यव्यापी संपाला पाठिंबा दिला असला तरी या संपाचा महापालिका रुग्णालयांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे यांनी सांगितले की, वसतिगृहांच्या अडचणींसोबत स्टायपेंड वेळेवर न मिळणे आणि केंद्रीय वैद्यकीय संस्थांमध्ये ज्या पटीत स्टायपेंड दिले जाते त्या पटीत आम्हाला ते येथे दिले जात नाही. या समस्यांबाबत आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारसमोर आमच्या मागण्या मांडत आहोत, मात्र आम्हाला केवळ आश्वासने मिळत आहेत. त्यामुळे आज बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मार्ड’च्या पत्रात काय म्हंटल आहे?
‘मार्ड’च्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि सेंट्रल ‘मार्ड’ची माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब, सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन, कमिशनर डीएमईआर डायरेक्टर डीएमईआर, जॉइंट सेक्रेटरी फायनान्स डिपार्टमेंट यांच्यासोबत संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी महारास्त्रातील निवासी डॉक्टरांच्या समस्या समजून घेतल्या व ‘मार्ड’च्या तीनही मागण्या अगदी बरोबर असून, त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु ४ ऑक्टोबर २०२३ रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये या तीनही मागण्या मान्य करून चार महिने उलटून सुद्धा त्यापैकी एकाही मागणीची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे या मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.
‘या’ आहेत निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या
- निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
- निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.
- निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.