मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक असून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रतन टाटा यांना काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या टाटा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रतन टाटा यांचा रक्तदाब रात्री कमी झाला होता. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अनेकांकडून रतन टाटा हे लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जात आहे. आताही, सोशल मीडियाच्या माध्यमातून गेट वेल सून म्हणत रतन टाटा यांच्या उत्तम प्रकृतीसाठी व लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सर्वत्र केली जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी पत्रकाद्वारे प्रकृतीविषयक माहिती दिली होती. ”वयोमान लक्षात घेता माझ्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत, काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही,” असं रतन टाटा यांनी सांगितलं होते.