Ramdas Kadam on Gajanan Kirtikar: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि खासदार गजानन कीर्तीकर यांच्यातील वादाने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. माजी मंत्री रामदास कदमांनी पुन्हा एकदा गजनान किर्तीकरांचे ‘वस्त्रहरण’ केले आहे. खासदार गजानान कीर्तीकर यांनी आपल्या बायकोशी देखील गद्दारी केली आहे. पुण्याला कशासाठी जाता? पुणे येथे शेण खायला का जाता?, असं म्हणत कदम यांनी कीर्तीकर यांचे वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी बाहेर काढल्या आहेत. एबीपी माझाशी बोलताना माजी मंत्री रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकरांवर स्फोटक आरोप केले.
जर तुमचं वस्रहरण केलं तर तुम्हाला एकही महिला मतं देणार नाही. महिला तुम्हाला चपलेने मारल्याशिवाय राहणार नाहीत. पुण्यात काय आहे, हे जर मी सांगितलं तर कीर्तीकरांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आज 6 वाजता भेटायला जाणार आहे, असं रामदास कदम म्हणाले.
कीर्तीकर-कदम वाद काय?
गजानन कीर्तीकर हे मुंबईच्या उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार आहेत. माजी मंत्री रामदास कदम यांनी या मतदारसंघावर आपल्या मुलासाठी दावा केला आहे. खासदार गजानन कीर्तीकर यांचे वय झाल्यामुळे त्यांनी या मतदारसंघातून लढू नये. कीर्तीकर हे शिवसेना पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात, असेही त्यांनी म्हटले होते. कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे सध्या उद्धव ठाकरे गटात आहेत. ठाकरे गटाकडून तेच उमेदवार असणार आहेत. तर, रामदास कदम हे मुलगा सिद्धेश कदमसाठी आग्रही आहेत. खासदार कीर्तीकर यांनी रामदास कदम यांच्या टीकेला उत्तर देताना प्रत्यारोप केले होते. गद्दार कदमांच्या तोंडी दुसऱ्यांच्या गद्दारीची भाषा ही हास्यास्पद आहे, अशी टीका कीर्तिकरांनी केली होती.