मुंबई : वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर नऊ उड्डाणपूल बांधण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) प्रस्ताव गेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाकडून या प्रस्तावाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे दिसून आले आहे.
२०१८ मध्ये एमएसआरडीसीने केंद्र सरकारला सादर केलेल्या प्रस्तावात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे सुचवले होते. महामार्ग हा जलद गतीचा असूनही, वाहनांच्या जास्त संख्येमुळे कोंडी वाढत आहे. त्यामुळेच महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रे आणि गर्दीच्या चौकांचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांचा अहवाल तयार करण्यात आला होता.
या प्रस्तावात नऊ विशिष्ट ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे. सोमाटणे फाटा, लिंब फाटा, तळेगाव-चाकण रोड, एमआयडीसी वडगाव, देहूरोड वाय जंक्शन, वडगाव फाटा, निगडी फाटा ते कामशेत, कार्ला फाटा आणि कान्हे फाटा यांचा समावेश होता. खोपोली आणि लोणावळादरम्यानच्या १६ किलोमीटरच्या वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी या उड्डाणपुलांची आवश्यकता या अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे.
प्रस्तावामध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत उड्डाणपूल ३०० ते ५०० मीटर लांब, तसेच प्रकल्पासाठी २०८ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अजूनही प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्याने प्रकल्प धूळखात पडून असल्याचे दिसून आले आहे.