मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून सर्वच पक्षांचे नेते गाव दौरे करत आहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्षाला एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडण्याचे सत्र सुरूच आहे. अशातच आता मुंबईतील काँग्रेसच्या आणखी एका नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे. कॉंग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त या लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या वर्तुळात सुनील दत्त यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. त्यांच्यानंतर प्रिया दत्त यांनी हा वारसा पुढे नेण्याचं काम केलं होतं. मात्र, 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर प्रिया दत्त यांची खासदारकी गेली होती. त्यानंतर पक्षसंघटनेत प्रिया दत्त या बाजूला सारल्या गेल्या होत्या. बराच काळापासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रिया दत्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांना शिंदे गटाकडून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यामुळे प्रिया दत्त या राजकारणाच्या दुसऱ्या इनिंगला प्रारंभ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस पक्षाला धक्क्यावर धक्के
राज्यात काँग्रेस पक्षाला धक्क्यावर धक्के बसण्याचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा या बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. यापैकी मिलिंद देवरा हे शिंदे गटात, बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात तर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता प्रिया दत्त या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
कोण आहेत प्रिया दत्त
प्रिया दत्त या 2009 साली उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांना भाजपच्या पुनम महाजन यांनी पराभूत केलं. एकेकाळी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर प्रिया दत्त यांचा दबदबा होता. परंतु, 2014 मधील भाजपचा शक्तिशाली उदय आणि काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागल्याने सक्षम उमेदवार असूनही प्रिया दत्त यांचा पराभव पत्कारावा लागला.