मुंबई: पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पुणे शहराध्यक्ष (Prashant Jagtap) प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस पक्षात (Congress) प्रवेश केला. यावेळी “आता राजकारण सोडेल पण काँग्रेस सोडणार नाही!” असं वक्तव्य (Pune Politics) त्यांनी केलं. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या (Pune Mahapalika Nivadnuk) पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. पक्षप्रवेशावेळी गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक देऊन प्रशांत जगताप यांचे स्वागत करण्यात आले. (Latest Marathi News)

मला ठाकरे आणि शिंदे गटाकडून ऑफर पण…
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडल्यानंतर प्रशांत जगताप यांना शिवसेना ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑफर देण्यात आली होती. मात्र आपली पुढील राजकीय वाटचाल ही पुरोगामी विचारधारेशी ठाम असलेल्या पक्षासोबतच असेल, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानुसार आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माझी लढाई विचारसरणीशी
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना प्रशांत जगताप यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाचा 135 वर्षांचा मोठा इतिहास आहे. हा पक्ष एक अथांग सागर आहे. कोणताही वाद न करता मी माझा पूर्वीचा पक्ष सोडला. गांधी, नेहरू, शिव, शाहू आणि आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्यासाठी मी काँग्रेसमध्ये आलो आहे. माझी लढाई भाजप आणि संघाच्या विचारसरणीविरोधात आहे. भाजपला टक्कर देण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्ये आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर शिवसैनिकांचा तुफान राडा! ‘कमर्शिअल’ तिकीट वाटपाच्या आरोपाने खळबळ..
पक्षाशी एकनिष्ठ राहील
राजकारण बंद करेन पण काँग्रेस सोडणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. पक्ष जो निर्णय घेईल, त्या निर्णयाशी मी एकनिष्ठ राहीन, असेही त्यांनी सांगितले. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडीच्या हालचाली सुरू झाल्याने प्रशांत जगताप नाराज होते. भाजपची साथ देणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी नको, अशी भूमिका घेत त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संविधान रक्षणासाठी आणि पुरोगामी विचारांसाठी लढणाऱ्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी आज अधिकृतपणे जाहीर केला.







