लातूर: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद (Shocking News) शाहजानी येथे पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची (Latur News) धक्कादायक घटना घडली आहे. इम्रान बेलुरे (Nilanga News) असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी इम्रानने व्हिडिओ तयार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूरपडे आणि वाहनचालक तानाजी टेळे हे आपल्याला व कुटुंबीयांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. (Latest Marathi News)

इम्रान बेलुरे याच्यावर चोरी आणि घरफोडीचे दोन गुन्हे दाखल होते. रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पोलीस त्याची वारंवार चौकशी करत होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मागील एक वर्षापासून पोलीस सतत घरी येऊन त्रास देत होते. घरातील महिलांशी अर्वाच्य भाषेत बोलणे, नातेवाईकांना धमकावणे तसेच मध्यरात्री गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेणे असे प्रकार सुरू होते. या सततच्या मानसिक त्रासामुळे इम्रान नैराश्यात होता.
गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 दरम्यान तेरणा नदीकाठी झाडीत इम्रानने आत्महत्या केली. घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी औराद पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.







