मुंबई : मुंबईच्या दहिसर परिसरात गुरुवारी ८ फेब्रुवारीला शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरीस नोरोन्हो या व्यक्तीने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. या थरारक घटनेनं मुंबईसह संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे यानंतर आरोपीने स्वत:ला देखील संपवलं.
गेल्या दहा दिवसात मुंबईत गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा जलद गतीने तपास व्हावा, यासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे. या संदर्भात मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी माहिती दिली आहे.
घोसाळकर यांची जुन्या वादातून हत्या
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या जुन्या वादातून झाली असावी, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही हत्या प्री प्लान असून आरोपी मॉरीस याने घोसाळकर यांना फोन करून आपल्या ऑफिसला बोलावून घेतलं. त्यानंतर फेसबुक लाईव्ह करत त्यांची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं, घटनास्थळावरून आम्ही पुरावे ताब्यात घेतले आहेत. हत्या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास केला जाईल, असंही गुन्हे शाखेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काय नवीन माहिती समोर येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरून गेलं आहे.
कोण आहेत अभिषेक घोसाळकर?
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. विनोद घोसाळकर २००९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेचे आमदार होते. मुंबईतील दहिसर मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही काम केलं आहे. अभिषेक घोसाळकर हेही माजी नगरसेवक होते.