मुंबई : अलीकडच्या काळात ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशातच सध्या एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे. ऑनलाईन मैत्री करून तरुणांना हॉटेलवर बोलावून मोठ्या-मोठ्या बिलांच्या नावाखाली लुटलं जात आहे. याच टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांकडून करण्यात आला असून, २२ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

डेटिंग अॅप्सवर फेक महिला प्रोफाईल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक व अवाजवी बिलाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण 22 जणांना अटक केली असून, यात आणखी किती जणांचा समावेश आहे याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये 6 महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
एका तरुणाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तक्रारदार तरुणाने सांगितले की, ‘TINDER अॅपवरून झालेल्या एका ओळखीत त्याला बोरीवलीतील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं. जिथे ड्रिंक्सचा बहाणा करत त्याच्याकडून 14,700 रुपये QR कोडद्वारे ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले गेले.
पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे नवी मुंबईतील एका हॉटेलवर छापा टाकून दिल्ली, गाजियाबाद आणि उत्तर प्रदेश येथून आलेल्या 15 पुरुष आणि 6 महिलांना ताब्यात घेतले आहे. ही टोळी Tinder, Bumble, OkCupid, MeetMe यांसारख्या अॅप्सवर बनावट महिला प्रोफाईल तयार करून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत लुटत होती.
ही टोळी भेटीसाठी ठराविक हॉटेलमध्ये बोलावून, हॉटेल मॅनेजरच्या मदतीने बनावट बिल तयार करून तरुणांकडून पैसे उकळत होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या कारवाईत 27 मोबाईल, एक पोर्टेबल प्रिंटर, स्वाईप मशीन असा 3.74 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरु असून, अशा प्रक्रारे किती जणांची फसवणूक केली याची देखील चौकशी करत आहेत.







