मुंबई : एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून, आता राज्य निवडणूक आयोगातर्फे देखील तयारी सुरु झाली आहे. आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत महत्वाची बैठक आयोजित केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 हा या बैठकीचा विषय असून 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक पार पडणार आहे.

या बैठकीत मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आहे व काय माहिती घेऊन बैठकीला हजर राहायचे याबाबत या पत्रात सांगण्यात आलं आहे.
राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती व 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांचा (महानगरपालिका वगळून) पूर्वतयारीचा विभागनिहाय आढावा राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत.
बैठकीत कोणत्या विषयांचा आढावा घेण्यात येईल?
निवडणुका घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, मतदार संख्या, मतदान केंद्र, ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM), आवश्यक मनुष्यबळ, वेळेवर उपस्थित होणारे मुद्दे या विषयाची माहिती तयार करून ती आयोगास पीडीएफ फॉरमेटमध्ये ई-मेलद्वारे 9 जुलै 2025 रोजी किंवा तत्पूर्वी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सर्व मुद्यांसंदर्भातील माहितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना पाठवले आहे.







