
Police Bharati : मुंबई : राज्यात विविध ठिकाणी पोलीस आणि रेल्वे पोलीस फोर्स (RPF) भरतीसाठी मैदानी चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांदरम्यान 1600 मीटर धावण्याची स्पर्धा देताना आणखी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी बीड आणि सांगली येथे अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. आता मिरा भाईंदर परिसरातील भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील 30 वर्षांचा अक्षय मिसाळ हा तरुण पोलीस भरतीसाठी मुंबईत आला होता. घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस मैदानावर सोमवारी सकाळी तो चाचणीसाठी उपस्थित झाला. पोलीस होण्याचे स्वप्न आणि कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याची इच्छा मनात ठेवून तो तिसऱ्यांदा भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. सकाळी सुमारे 10 वाजता 1600 मीटर धावण्याची चाचणी सुरू झाली. अक्षयने पूर्ण ताकदीनिशी धाव घेत अंतर पूर्ण केले.

मात्र धाव पूर्ण केल्यानंतर काही वेळातच त्याला चक्कर आली आणि तो मैदानावर कोसळला. तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अक्षयच्या निधनाची माहिती गावी पोहोचताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरातून आनंदाने निघालेला मुलगा परत येणार नाही, यामुळे नातेवाईकांमध्ये शोक व्यक्त होत आहे. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.






