धारावी : धारावी येथे शनिवारी (21 सप्टेंबर) बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी मशिदीचा कथित बेकायदेशीर भाग पडला. त्यावेळी त्या ठिकाणी मोठा जमाव जमला होता. यावेळी जमावाने जोरदार विरोध करत गोंधळ घातला आणि बीएमसीच्या वाहनाच्या काचाही फोडल्या. याप्रकरणी आता धारावी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्यावर दंगल भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कलम १३२, १८९ (१,२), १९०, १८४(४), १९१(२), ३२४(३), १९१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कलम १३२ अजामीनपात्र आहे. सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल कलम 132 लागू आहे. सध्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर धारावी पोलिस ठाण्यापर्यंत सुमारे 5 हजार लोकांचा जमाव जमल्याचे समोर आले होते. या गर्दीत अनेक बाहेरचे लोकही होते. धारावी पोलीस बाहेरून आलेल्या लोकांची ओळख पटवत होते. बीएमसीच्या विध्वंसाच्या कारवाईच्या विरोधात जमाव जमवण्यासाठी भडकाऊ पोस्ट आणि व्हिडिओ बनवण्यात आल्याचंही तपासात समोर आलं आहे.
या पोस्ट आणि व्हिडिओ शुक्रवारी रात्रीपासून व्हायरल होऊ लागल्या. बीएमसीच्या कारवाईच्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी धारावीतील मशीद परिसरात मोठी गर्दी जमली होती. आंदोलक रस्त्यावर बसल्यामुळे वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. यानंतर पोलिसांचे पथक आले आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वाहने जाऊ शकतील यासाठी त्यांना बाजूला करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांची समजूत काढण्यासाठी स्थानिक लोकही पुढे आले होते.
दरम्यान, याप्रकरणी बीएमसीने बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी मशीद समितीला आठ दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत बीएमसी मशिदीवर कोणतीही कारवाई करणार नाही.