Pm Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १२ जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांचे दुपारी १२:१५ च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच देशातील तरुणांना संबोधित करतील.
पंतप्रधान मोदी दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई येथे दुपारी ४:१५ च्या सुमारास, पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते विविध विकासकामांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.
१२ जानेवारी हा दिवस देशात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद जी यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त आज २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये साजरा केला जात आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते उपस्थितीत राहणार असल्याची माहिती आहे.
तसेच नागरिकांसाठी शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतुक सुविधा अधिक बळकट करून ‘सुलभ गतिशीलतेला’ चालना देणे, पंतप्रधानांचे ध्येय आहे. या अनुषंगाने मुंबई ट्रान्सहार्बर लिंक बांधण्यात आला असून त्याचे नाव आता ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे. या पुलाची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्याच हस्ते डिसेंबर २०१६ मध्ये झाली होती.