नालासोपारा : देशात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. त्याविरोधात देशभरात आंदोलनं सुद्धा सुरु आहेत. मात्र, अजूनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी होत नाही आहे. अशातच आता पालघर जिल्ह्यातील नालासोपाराच्या आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोकरी व राहण्याचा आसरा देऊन एका 30 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नरेंद्र मोर्या (वय 31), प्रकाश सिंग (वय 26) आणि पंचराज सिंग (वय 35) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विवाहित असून तिला एका दहा वर्षाचा मुलगा आहे. मध्यप्रदेशची असलेली महिला नव-याशी भांडून घरातून बाहेर पडली होती. ती पुण्याला ट्रेनने येत असताना एका प्रवाशासोबत तिची ओळख झाली. कामाच्या शोधात ती पुण्यात उतरली पण तिला काम मिळालं नाही. त्यानंतर ती वसईला आली. तिथं आरोपी नरेंद्र मोर्य याने तिला काम दिलं. त्यानंतर त्या महिलेच्या राहण्याची व्यवस्थासुद्धा केली. याच काळात महिलेसोबत त्याने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर नरेंद्र याने त्याचा मित्र प्रकाश सिंग आणि पंचराज सिंग यांनाही सोबत आणलं. त्या दोघांनीही तिच्यावर अत्याचार केले असल्याचा आरोप महिलेने पोलीसांकडे तक्रारीत केला आहे.
याप्रकरणी पीडितेने पोलीसांत धाव घेतली आहे. यावेळी पीडितेने दिलेल्या माहितीनुसार अकोले पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम 64, 70 (1) आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे. या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.