मुंबई: मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात सोमवारी रात्री मृतदेह असलेली एक सुटकेस मिळाली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. ही सुटकेस घेऊन तुतारी एक्स्प्रेसने मुंबईबाहेर निघण्याच्या तयारीत असलेल्या प्रवीण चावडा आणि त्याचा साथीदार शिवजित सिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. हे दोघेही मूकबधीर असल्याने पोलिसांना ही भाषा जाणणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन चौकशी करावी लागत आहे. प्राथमिक चौकशीनंतर या हत्याप्रकरणाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेला अर्शद अली सादिक अली शेख आणि आरोपी प्रवीण चावडा, शिवजित सिंग हे तिघेही मूकबधीर होते. सुरुवातीला सरळसोट हत्येचा प्रकार वाटणारे हे गुन्ह्याचे प्रकरण प्रचंड गुंतागुंतीचे असल्याचे दिसते.
मयत अर्शद अली सादीक शेख, जय चावडा आणि शिवजीत सिंह हे तिघेही मूकबधिर एकमेकांचे मित्र होते. रविवारी संध्याकाळी दारु प्यायला बसले असताना शिवजीत सिंह आणि अर्शद अली सादीक शेखचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात शिवजीतने अर्शद अली सादीक शेखचा खून केला. त्यानंतर जय आणि शिवजित सिंह यांनी सादिकचा मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून सुटकेसमध्ये भरला. हा मृतदेह दोघांनी मिळून टॅक्सीत टाकला. त्यानंतर जय चावडा पायधुनीवरून बॅग घेऊन छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात आला. तिथून खोपोली लोकल पकडून तो दादरला उतरला. यानंतर जय चावडा ही बॅग घेऊन तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढत होता. त्यावेळी पोलिसांनी संशय आला आणि त्यांनी त्याला हटकले असता त्याने बॅग उघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला होता.
पोलिसांची ट्रँगल थिअरी..
पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर जय चावडा आणि शिवजित सिंग यांच्या चौकशीतून जी माहिती समोर आली आहे त्यावरुन पोलिसांनी एक ट्रँगल थिअरी मांडली आहे. जय चावडा आणि शिवजीतच्या जबानीत काहीशी तफावत आढळून आल्याने या हत्याप्रकरणाबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. मात्र, पोलिसांच्या अंदाजानुसार या हत्येचे पहिले कारण म्हणजे अर्शदने जय चावडा याच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. हे पैसे अर्शदने परत दिले नव्हते. याच वादातून त्याची हत्या झाली असावी, हा पोलिसांचा पहिला अंदाज आहे.
दुसऱ्या थिअरीनुसार, अर्शद विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याची पत्नीही मूकबधिर आहे. मात्र, त्याच्या पत्नीचे शिवजित सिंह याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. रविवारी दारु प्यायला बसल्यानंतर अर्शदच्या बायकोचा विषय निघाला आणि शिवजित सिंग याच्याशी त्याचा वाद झाला. हाच वाद विकोपाला गेला. तर शेवटची शक्यता म्हणजे अर्शद शेख याच्याकडे जय चावडाचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडमधील नाजूक क्षणांचे काही व्हीडिओ होते. हेच इंटिमेट व्हीडिओ दाखवून अर्शद शेख हा जय चावडला ब्लॅकमेल करत असावा, असा संशय पोलिसांना आहे. मात्र, यापैकी नक्की कोणती थिअरी घरी आहे, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही.
अखेर तो व्हीडिओ मिळाला..
जय चावडा, शिवजित सिंग आणि अर्शद शेख रविवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे दारु प्यायला बसले होते. तेव्हा दारू संपली आणि जय चावडा आणखी दारु आणण्यासाठी घराबाहेर गेला. त्यावेळी शिवजित सिंग आणि अर्शद शेख यांच्यात जोरदार भांडण झाले. तेव्हा शिवजित सिंग याने अर्शदचे कपडे उतरवून त्याचे हात बांधले. यानंतर शिवजितने अर्शदला मारहाण केली. त्यावेळी त्याने एक बाटली फोडून अर्शदच्या शरीरावर ओरखडे ओढले. दारु आणायला गेलेला जय चावडा घरी परतला तेव्हा त्याने हा प्रकार बघितला. त्याने हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शुट केला. शेवटी शिवजितने हातोडीने अर्शद शेखच्या डोक्यात घाव घातला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आता हा व्हीडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.