मुंबई: शासनाने दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द करून प्रवाशांना दिलासा दिला. मात्र, दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाही शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेट, दिवाळी उचल या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला शासनाने पाने पुसल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध आर्थिक प्रलंबित मागण्यांबाबत झालेल्या बैठकीतदेखील दिवाळी भेटीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. यामुळे यंदाची दिवाळी एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या रकमेत साजरी करावी लागणार आहे.