मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा आज मुंबईत पार पडला. या मेळाव्यात महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. खासदार शरद पवार यांनी महिलांना अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. “समाजात चुकीचं काही दिसलं तर रस्त्यावर उतरा, सरकार तुमच्यावर केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका. सरकार हे बदलत असतं, आपण त्या केसेस मागे घेतो”, असं देखील पवार म्हणाले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
या मेळाव्यात अनेक तास बसून देखील कुणी सभागृहाच्या बाहेर गेलं नाही. सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कामाबाबतची भूमिका मांडली आणि ऐकूण देखील घेतली आहे. भविष्यात आपल्याला काही कार्यक्रम हाती घ्यायचे आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिला आरक्षण, महागाई असे मुद्दे आहेत.
शासकीय शाळा खासगी कंपनीना देणे गैर
राज्य सरकारने शाळा खासगी कंपनीला देण्याचा यांनी निर्णय घेतला आहे. आता जी शाळा खासगी कंपनी दत्तक घेईल, तिला तिचा वापर करता येईल. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर नाशिक जिल्ह्यामध्ये एक शाळा एका मद्य कंपनीला दिली. त्यांनी त्या शाळेच्या ग्राऊंडमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला हे खूप गंभीर आहे, असं देखील शरद पवार म्हणाले.