मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत, या मागणीसाठी आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले. सरकारने टिकणारे आरक्षण देण्यासाठी २ जानेवारीपर्यंत मुदत मागितली आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सरसकट आरक्षण दिल्यास ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे. ओबीसींच्या पावणेचारशे मागास जमाती आहेत. आमच्या मुला-बाळांचे आरक्षण कुणबी दाखले देऊन हडप करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सुरु आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकश शेंडगे यांनी दिला.
प्रकाश शेंडगे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. भुजबळ मंत्रिमंडळात राहून संघर्ष करतील, आम्ही बाहेर राहून संघर्ष करु, असे शेंडगे यांनी सांगितले. राजीनामा देऊन बाहेर पडू नका, अशी विनंती आम्ही भुजबळ यांना केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी, भटके, विमुक्त रस्त्यावर उतरुन लढा उभारणार आहोत. दिवाळी संपली की, राज्यभर आंदोलन सुरु करणार आहोत, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय ठरवायचे, हे षडयंत्र हाणून पाडणार असल्याचेही शेंडगे यांनी स्पष्ट केले.
कुणबी दाखले देऊन कोणताही समाज मागासवर्गीय ठरत नाही. जात बदलण्याचा अधिकार कोणाला नाही. असे केल्यास आम्ही न्याय मागण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत आहोत. एखाद्या समाजाला मागास ठरवण्याची एक प्रक्रिया असते. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोग आहे, असे प्रकाश शेंडगे म्हणाले. आमच्या हक्काच्या रक्षणासाठी १७ तारखेला अंबडला, त्यानंतर २६ नोव्हेंबरला हिंगोलीला दुसरा मेळावा होईल. ओबीसी रस्त्यावर येऊ शकत नाही, असे समजू नये. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण आम्ही करणारच आहोत. ओबीसी समाज ठामपणे भुजबळांच्या पाठिशी उभा राहणार आहे, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.