Navi Mumbai Airport to Thane Flyover: ठाणे : ठाणेहून नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी सध्या मोठी कसरत करावी लागते. कळवा नाक्यावरील वाहतूक किंवा पूर्व द्रुतगती महामार्गावरील गर्दीमुळे प्रवासाला किमान 90 मिनिटे लागतात. मात्र येत्या काळात हा वेळ सुमारे 30 मिनिटांपर्यंत कमी होऊ शकतो. ठाणे आणि नवी मुंबई विमानतळाला थेट जोडणारा उन्नत दुहेरी मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे.

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबर 2025 रोजी झाले असून डिसेंबर 2025 पासून विमानसेवा सुरू झाली आहे. भविष्यात विमानांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने प्रवाशांसाठी चांगली जोडणी आवश्यक आहे. त्यासाठी हा नवीन उन्नत मार्ग उभारला जाणार आहे.

हा मार्ग ठाण्यातील दिघा परिसरातील पटनी मैदान येथून सुरू होईल. वाशीतील पाम बीच रोडपर्यंत सुमारे 17 किलोमीटरचा मार्ग ठाणे-बेलापूर महामार्गाला समांतर असेल. त्यानंतर विमानतळापर्यंत आणखी 9 किलोमीटरचा दुमजली उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे. या मार्गावर वाहनांना ताशी 100 किलोमीटर वेगाची मर्यादा असेल आणि सहा ठिकाणी इंटरचेंजची सुविधा असेल. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मीरा-भाईंदर परिसरातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2025 मध्ये या प्रकल्पास मंजुरी दिली. अंदाजित खर्च सुमारे 6,363 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर सिडकोमार्फत राबवला जाणार आहे. या मार्गावर टोल आकारला जाईल. पर्यावरण आणि इतर मंजुरींसाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच नवी मुंबई आणि मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडण्याचाही प्रस्ताव आहे.





