नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (आयटा) एनएमआय हा स्थान कोड प्रदान केल्याची घोषणा नुकतीच केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयएएल) ही मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची एक उपकंपनी आहे. नवी मुंबई विमानतळ उभारणीतील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, असून, या विमानतळाची जागतिक ओळख पटवून देण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. हा विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध असून, एनएमआयएएलद्वारा सुरू असलेल्या कालबद्ध विकासाबाबत आम्ही समाधानी असल्याचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे. आयटा कोड हे विमानचालन आणि प्रवास उद्योगाचा अविभाज्य भाग आहे. या स्थान कोडमुळे त्या त्या व्यावसायिक विमान कंपनीचे गंतव्यस्थान ओळखण्यात प्रवाशांना मदत मिळते. ही कोडिंग सिस्टम प्रवासी व मालवाहू वाहतुकीच्या उद्देशाने तयार केली गेली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च २०२५ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. त्याच्या सुरुवातीच्या टप्यात विमानतळाची वार्षिक क्षमता २० दशलक्ष प्रवासी आणि प्रतिवर्षी ०.५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची असणार आहे.