मुंबई : मुंबईत येणा-या पाचही टोलनाक्यांवरुन ये-जा करणा-या हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे बोललं जात आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांचा टोल 45 रुपये करण्यात आला होता. दर तीन वर्षांनी टोलवाढीच्या नियमांतर्गत ही वाढ करण्यात आली होती. सन 2000 पासून, मुंबईत ये-जा करणारे लोक शहराच्या प्रवेशद्वारावर टोल शुल्क भरत आहेत. शहरातील उड्डाणपुलांच्या बांधकामाशी संबंधित खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टोल लागू केला होता.