Mumbai Municipal Corporation : मुंबई : मुंबई महानगरपालिका मराठी फलक नसणाऱ्या शहरातील दुकाने आणि आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करणार आहे. मंगळवार, २८ नोव्हेंबरपासून कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यासंबंधीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी २४ प्रशासकीय विभागस्तरावर दुकाने आणि आस्थापना खात्यातील वरिष्ठ सुविधाकार आणि सुविधाकारांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, २०१८ व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२ च्या अनुक्रमे नियम ३५ व कलम ३६ क च्या तरतुदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांना दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावण्याबाबत दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपुष्टात येत असून दुकाने व आस्थापनांवर अधिनियमातील तरतुदींनुसार मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक न लावणाऱ्यांविरोधात मंगळवार, २८ नोव्हेंबरपासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईमधील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावण्याचे बंधनकारक असणार आहे. न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी संबंधित अधिकाऱ्यांनाही दिले आहेत.