बदलापूर : बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानेही या घटनेसंदर्भात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत एन्काऊंटरसंदर्भात शंका उपस्थित केली. दरम्यान अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात हायकोर्टात आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली.
आज झालेल्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने राज्य सरकारला काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. त्यात तक्रारदार, याचिकाकर्ता आणि त्यांच्या वकिलांना सुरक्षा पुरवण्याबाबत राज्य सरकारला योग्य तो निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहे.
आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीत पाणी पिण्यासाठी वापरलेला ग्लास ताब्यात घेतलात का?, आरोपीनं घटनेपूर्वी पाणी प्यायलं असेल तर त्यावर त्याच्या हाताचे ठसे असायला हवेत, असे न्यायालयाने सांगितले. तसेच घटनेदरम्यान अक्षयने ज्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या होत्या त्याच्या रिकामी पुंगळ्या न्यायवैद्यक शाळेत पाठवल्यात आहेत का?, जो पोलीस गाडीत जखमी झाला आहे, त्याच्या जखमेची शास्त्रोक्त तपासणी केली आहे का?, असे राज्य सरकारला महत्त्वाचे प्रश्न न्यायालयाकडून विचारण्यात आले आहे.
तसेच घटनेदरम्यान, निलेश मोरे या जखमी पोलिसाला लागलेली गोळी नेमकी कोणत्या बंदुकीतून झाडली होती?, तसेच त्याच्या जखमेबाबतही न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालही सादर करण्याचे न्यायालयाकडून निर्देश जारी केले. दरम्यान आजच्या सुनावणीत अक्षय शिंदे याने चालवलेली गोळी पोलिस गाडीच्या आरपार गेल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. त्यावर या गोळ्या शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? असा प्रश्न हायकोर्टाने विचारला आहे.