Mukesh Ambani : मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांना येणाऱ्या धमकीच्या ईमेलचं सत्र सुरूच आहे. मुकेश अंबानीयांना जीवे मारण्याची धमकी देत कोट्यवधींच्या खंडणीची मागणी करणारे तब्बल 5 ईमेल आले आहेत. यापूर्वीही अंबानींना धमकीचे तीन ईमेल आले होते. त्यानंतर पुन्हा आणखी दोन ईमेल आले आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून अंबानींना येत असलेल्या या धमकीच्या ईमेलचा कसून तपास सुरू आहे. मुंबई पोलीस तांत्रिक माहितीच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही आरोपीचा शोध लागत नाही.
उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये तुम्ही गांभीर्यानं घेत नसल्यानं आता परिणामांसाठी तयार राहा, असा इशारा अंबानींना देण्यात आला आहे. अशातच अंबानींना आलेल्या धमकीच्या मेलची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. हे धमकीचे ईमेल पाठवणारा बेल्जियम स्थित फेन्स मेल या कंपनीच्या सुविधेचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या 27 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानींच्या ईमेल अकाऊंटवर एक मेल आला होता. या मेलमध्ये त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच जर पैसे दिले नाहीत, तर आपला जीव गमवावा लागेल, असं म्हटलं होतं. त्यानंतर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान पहिल्यांदा आरोपीनं 20 कोटी तर दुसऱ्यांदा 200 कोटीची मागणी केली होती. यानंतर आरोपीनं तिसरा ईमेल करत 400 कोटी रुपयांची मागणी आरोपींनी केली होती.