मुंबई: प्रवासी वाहतूक करीत असताना महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहक यांना एसटीच्या वतीने रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक-वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना समप्रमाणात वाटण्यात येणार आहे. ही रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
एसटी महामंडळाने आपले उत्पन्न वाढावे म्हणून विविध उपयोजना व अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. ‘प्रवासी राजा दिन’, ‘कामगार पालक दिन’ यासारखे उपक्रम राबवून प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच तोट्यातील आगारांना मार्गदर्शन करण्यांसाठी पालक अधिकारी नियुक्त केले आहेत. इंधन बचतीसाठी चालक व यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे एसटी महामंडळाने ऑगस्ट २०२४ या महिन्यात १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये नफा मिळवला आहे.
या चालक-वाहकांना भत्ता मिळणार नाही
प्रवासी तक्रार, प्रवाशांशी केलेली गैरवर्तणूक अथवा उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गाचा वापर केल्यास संबंधित चालक-वाहक यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे योग्य कामगिरी करणाऱ्या चालक-वाहकांना रोख स्वरूपात प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.