मुंबई: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवार, ११ एप्रिल रोजी एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. या वेळी लोकहित सर्वोच्च मानत सरनाईक यांनी थेट कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नाला हात घातला. एसटी कर्मचान्यांना मार्च महिन्याच्या एकूण वेतनापैकी केवळ ५६ टक्के वेतन उशिराने प्राप्त झाले. मात्र, यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असे आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले.
राज्यातील १३ कोटी जनतेला सुरक्षितता आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ आहे. भविष्यात एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवासी जनतेला दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असे सुतोवाच सरनाईक यांनी व्यक्त केले. दरम्यान, आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन केवळ ५६ टक्के देता आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे महिनाभर कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल!
त्यासाठी राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन, परंतु आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही, याची जबाबदारी मी घेईन, असे सरनाईक यांनी सांगितले.