मुंबई: एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2022 ची मेरिट लिस्ट जाहीर झाली आहे. विनायक नंदकुमार पाटील याने राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर धनंजय वसंत बांगर याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये अनिता विकास ताकभाते हिने बाजी मारली असून दिपा चांगदेव जेधे हीने दुसरा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे राज्यसेवेच्या 600 पदांसाठी गुरूवारी दुपारी मुलाखती घेण्यात आल्या आणि संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.
राज्यसेवेच्या 600 पदांसाठी 2022 साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम 1800 उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. या उमेदवारांच्या मुलाखतीचा शेवटचा टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.
जा. क्र. 099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 18, 2024
उमेदवारांना पसंतीक्रम द्यावा लागणार
एमपीएससीकडून मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांना आपला पसंतीक्रम द्यायचा आहे. 22 जानेवारी ते 29 जानेवारी या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना आपला पसंतीक्रम द्यायचा आहे. त्यानंतर या परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं एमपीएससीने म्हटलं आहे.