मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदासाठी सभागृहाचा दांडगा अनुभव असलेले शिवसेनेचे (ठाकरे) नेते आमदार भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. मातोश्री येथे शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेच्या (ठाकरे) आमदारांनी आपल्या स्वाक्षरीसह त्यांच्या नावाला एकमताने पाठिंबा दिला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे सोमवारी त्याच्या नावाची अधिकृत घोषणा होईल.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक मातोश्री येथे झाली. दिलीप सोपल व राहुल पाटील वगळता सेनेचे विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदार बैठकीला उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी कोणते आक्रमक मुद्दे मांडता येतील यावर बैठकीत चर्चा झाली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सेनेकडे आल्यास कोणाला जबाबदारी द्यायची, याबाबत झालेल्या चर्चेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांच्या नावांची चर्चा झाली. सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यासाठी अभ्यासू व्यक्तीची गरज असल्याचा मुद्दा ठाकरे यांनी मांडला. त्यावर जाधव यांच्या नावाचा विचार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. सर्व आमदारांनी स्वाक्षरी करून जाधव यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचे समजते. त्याची घोषणा ठाकरे यांच्याकडून सोमवारी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची अधिवेशनात संयुक्त रणनीती असावी. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम या वादग्रस्त मंत्र्यांवरून सभागृहात सरकारला कशा पद्धतीने लक्ष्य करायचे यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.







