मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईच्या वर्षा बंगल्यावर धडकणारे मनोज जरांगे पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, भाजप आमदारांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आर्थिक मदत कुणी पुरवली? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, अशी घोषणा विधानसभेत केली आहे. तसेच यामागचे सूत्रधार आम्ही शोधून काढू, असंही फडणवीसांनी सांगिलतं आहे. त्यामुळे जरांगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
विधिमंडळात जोरदार खडाजंगी
राज्य विधिमंडळात आज मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. त्यानंतर सत्ताधारी भाजपाने जरांगेंच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर आता जरांगेंच्या आदोलनाला आर्थिक मदत कोणी केली याची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. तसे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.