ठाणे : राज्यात शांतता राहावी म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करताय, तर जरूर गुन्हे दाखल करा. ते गुन्हे आम्ही अंगावर घेऊ. लोकांना आम्ही शांततेचे आवाहन करतोय. हे आमचं चुकतंय का?, असा प्रश्न विचारत, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घेतलेल्या सभेमध्ये सरकारला आव्हान दिले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आहेत. ठाण्यातील गडकरी रंगायतनला मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आव्हान दिले. या सभेला मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
दरम्यान, जरांगे ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांचो जंगी स्वागत करण्यात आलो. त्यांच्यावर २५ जेसीबींच्या माध्यमातून फुलांची उधळण करण्यात आली. या वेळी मराठा बांधवांनी बाईक रॅलीही काढली. या वेळी जरांगे पाटलांनी तोफ डागली. जरांगे म्हणाले की, मराठा बांधव एकमेकांना अडीअडचणीत मदत करतात.
आता काहींच्या राजकीय स्वार्थासाठी आपल्यात वाद होऊ द्यायचे नाहीत. आम्ही हीच गोष्ट रात्रंदिवस सांगत आहोत. असे असतानाही ज्यांनी कार्यक्रम घेतले, त्यांच्यावरच तुम्ही गुन्हे दाखल करत आहात. पण लक्षात ठेवा, तुम्ही गुन्हे दाखल केले, तरी आम्ही थांबणार नाही. राज्यात शांतता राहावी म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करताय. तर जरूर करा. लोकांना आम्ही शांततेचं आवाहन करतोय. आमचं चुकतंय असल्यास जरूर सांगा.
दरम्यान, जरांगेंच्या ठाण्यातील सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. सभेपूर्वी भव्य रोड शो करण्यात आला. या वेळी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.