मुंबई : मुंबईत दाखल होण्यापूर्वी आझाद मैदानावरुन पोलीस प्रशासन आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद पेटला आहे. मी झोपेत असताना पोलिसांनी सह्या घेतल्या असा खळबळजनक आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. सध्या मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत आहेत. त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदन करण्यात आले.
“मी लोणावळ्यात असताना पोलिसांनी काहीतरी कागदावर सह्या घेतल्या. कोर्टाचा आदेश असल्याचे सांगितले. मी झोपेत होतो. आपण कोर्टाचा सन्मान करतो. यामुळे मी त्या इंग्रजी कागदावर लगेच सही केली. परंतु तो कागद आझाद मैदानासंदर्भात होता. आझाद मैदानाची परवानगी नाकारल्याचा तो कागद होता. माझी फसवणूक करुन ही सही घेतली आहे. परंतु जर त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी आहे”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे, हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावला आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. यामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलक पोहचू लागले आहेत. तर वाशी येथे थोड्याच वेळात मनोज जरांगेंची सभा होणार आहे. यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.