मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी करत शांततेत आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटलांनी अचानक आक्रमक भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत जरांगेनी थेट मुंबईतील सागर बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या घटनेचे पडसाद विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनातही उमटले आहेत.
राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज २७ फेब्रुवारी रोजी विधानपरिषदेत केली आहे.
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सगेसोयरे अध्यादेशावर कायदा करा, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर मराठा बांधवाने राज्यभरात आंदोलने केली. या आंदोलनाचे तीव्र पडसाद विधानसभा तसेच विधानपरिषदेतही उमटले आहेत.
दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी केली. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे. यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढायला हवे, तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करावी, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांची ही मागणी मान्य केली आहे.