मुंबई : गोरेगावमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर मुंबई पोलिसांच्या अंमलबजावणी कक्षाने कारवाई करत चार मुलींची सुटका केली. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून येथे व्यवस्थापक असलेल्या मुकेश ऊर्फ राहुल सहाने (२९) याला अटक केली आहे.
गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरमध्ये असलेल्या रिद्धी आयुर्वेदा वेलनेस सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी कक्षातील पोलीस निरीक्षक अनिता कदम यांना मिळाली होती. त्यानुसार अंमलबजावणी कक्षाच्या पोलीस पथकाने बुधवारी सायंकाळी गोरेगाव पोलिसांच्या मदतीने येथे एक बनावट ग्राहक पाठवून छापेमारी केली. पोलिसांनी या कारवाईमध्ये चार मुलींची सुटका करत सहाने याला ताब्यात घेतले. सहाने याच्या चौकशीत या मसाज पार्लरचे चालक राहुल आणि अनिताकुमारी कोरी असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी पीडित मुलींकडे केलेल्या चौकशीत त्यांना येथे महिना सहा हजार रुपये वेतन आणि शरीरसंबंध ठेवल्यानंतर ग्राहकाकडून मिळालेल्या रकमेतील एक हजार रुपये मुलींना देत असल्याचे उघड झाले आहे.