मुंबई: खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कॉंगेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच आम्ही सर्वजण एकत्र बसलो होतो, कारण आता लवकरच लोकसभेची आचारसंहिता येऊ शकते. अनेक विषयांची चर्चा आम्ही यानिमित्ताने केली आहे. याशिवाय राहुल गांधी हे सुद्धा १० मार्चपासून महाराष्ट्रात येत आहेत. त्यांची न्याय यात्रा मुंबईतसुद्धा येणार असून सभा देखील होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीसंदर्भात बैठकीत काही चर्चा झाली का? असा प्रश्न विचारल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, “साहजिकच सर्वच विषयांवर चर्चा झालेली आहे. जे कोणी समविचारी आहेत आणि ज्यांना भाजपची कार्यपद्धती व त्यांचं तत्वज्ञान ज्यांना पटत नाही, त्यांना बरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आम्ही सर्वजण तयारी करत आहोत.”
आगामी लोकसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काही नाही. ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची क्षमता अधिक ती जागा त्याची. हा एक मात्र फॉर्म्युला आहे. यात मतभेद कोणतेही मतभेद नाहीत. राज्यात काही जागा अशा आहेत, जिथे आम्हाला वाटतं की, कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येईल. तसेच शिवसेनेला वाटतं, त्यांचा उमेदवार निवडून येईल. अशा काही गोष्टी असतात, ज्याची चर्चा होते असते.
कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराजांसाठी काँग्रेसला हवी आहे. महाराजांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी, अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. सर्व काही फायनल झालं आहे. आता आमचं वंचितबहुजन आघाडीसोबत बोलणं सुरु आहे”, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.