मुंबई: महाविकास आघाडी फेव्हिकॉल का मजबूत जोड असून तो तुटणार नाही. विधानसभेची निवडणूक एकसंघपणे लढू, जनतेने कोणत्याही अंफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद शिगेला पोहोचला आहे. विदर्भ आणि मुंबईतील जागांवरून हेवेदावे सुरू आहेत. ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुहूर्तावर हा वाद चिघळल्याने आघाडीत तणातणी सुरू आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकून जागा वाटपावर तोडगा काढावा, अशी मागणी सुरू आहे. मुंबईचे प्रभारी रमेश चेन्निधला यांनीदेखील शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे) उद्धव ठाकरे यांची भेट घेत जागा वाटपावर सकारात्मक चर्चा झाल्याची भूमिका त्यांनी मांडली.
आघाडीत त्यानंतर झालेल्या चर्चेतही जागा वाटपावरील तिढा सुटलेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्ली गाठून जागा वाटपावर चर्चा केली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार या काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरू असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार, या बातम्यांत काहीही तथ्य नाही. जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला. काँग्रेस-शिवसेनेत कसलेही वाद नाहीत. भाजप आणि शिवसेना (ठाकरे) नेत्यांच्या भेटीबाबत काँग्रेसकडून कोणतेही विधान केलेले नाही. महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी आमच्या सर्वांचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.
आघाडीत चर्चेद्वारे अनेकदा त्यांच्यातील तिढा सोडवण्यात आला आहे. आता फक्त सात ते आठ जागांवर निर्णय घेणे शिल्लक आहे. जागा वाटपाबाबत मार्ग कसा काढायचा, ते ठरले आहे. महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाही. मात्र, शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये भांडणे लावण्याचे षड्यंत्र सुरू आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.