मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) ‘राष्ट्रवादीच्या विलीनीकरणा’वरून एक नवे वादळ उठले आहे. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नावरून आता सत्ताधारी भाजप आणि शरद पवार गट समोरासमोर आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलीनीकरणाच्या शक्यतेवरच शंका उपस्थित केल्यानंतर, शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी थेट ‘अस्थींची शपथ’ घेत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

नेमका वाद काय?
अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याबाबत हालचाली सुरू होत्या, असा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कडाडून टीका केली. “जर अजित पवारांची चर्चा सुरू असती, तर त्यांनी मला नक्कीच सांगितले असते. शिवाय, विलीनीकरण होणार होते तर मग अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार होते का?” असा रोखठोक सवाल फडणवीसांनी विचारला. फडणवीसांच्या या प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
शशिकांत शिंदेंचा पलटवार: ‘मी खोटे बोलणार नाही’
फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर देताना शशिकांत शिंदे भावूक झाले. “अजितदादांच्या जाण्यानंतर आम्ही राजकारण करतोय, असे चित्र निर्माण होणे दुर्दैवी आहे. मी दादांच्या अस्थींची शपथ घेऊन सांगतो की, विलीनीकरणाबाबत त्यांच्याशी आमची चर्चा झाली होती,” असे शिंदे म्हणाले.
शिंदे यांनी पुढे एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यांच्या मते, अजित पवार यांनी विलीनीकरणानंतरच्या धोरणांवरही चर्चा केली होती. “दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठका घेऊन मगच अंतिम निर्णय घेऊ, असे दादांचे नियोजन होते,” असा दावा शिंदेंनी केला. “आता दादा हयात नाहीत? पण आम्हाला जर राजकीय फायदाच उठवायचा असता, तर यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या सत्तेच्या निमंत्रणाला आम्ही नकार दिला नसता,” अशी आठवणही त्यांनी करून दिली.







