मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे (Maharashtra Politics) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar Plane Crash) गंभीर प्रश्न उपस्थित केले. अपघात की घातपात, यावर सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत त्यांनी व्हीएसआर कंपनी आणि कॅप्टन सुमित कपूर यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली. (Breaking News)

रोहित पवार म्हणाले की, “आम्ही सातत्याने पुरावे मांडत आहोत. काही गोष्टी संशयास्पद आहेत. तपास यंत्रणांनी केवळ औपचारिक चौकशी न करता सर्व बाजूंनी तपास करावा.” त्यांनी अपघातातील तांत्रिक बाबी, निर्णयप्रक्रिया आणि संबंधित कंपनीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी दोन राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबतही मोठा खुलासा केला. “आज अजित दादा आपल्यात नाहीत, त्यामुळे विलिनीकरणावर बोलणं योग्य नाही. मात्र, संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस झाल्यानंतर नेतृत्वात बदल करण्याची त्यांची इच्छा होती,” असे ते म्हणाले.

रोहित पवार यांच्या मते, अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा हवा होता आणि त्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांचे नाव त्यांच्या मनात होते. “अमोल कोल्हे अनेक बैठकींमध्ये सक्रिय होते. त्यादृष्टीने चर्चा पुढे सरकत होत्या,” असा दावा त्यांनी केला. तसेच, “दोनही पक्ष एकत्र यावेत, ही दादांची भावनिक इच्छा होती. राजकीय समीकरणांपेक्षा कुटुंब एकत्र यावं, असं त्यांना वाटत होतं,” असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांनी सांगितले की, विलिनीकरणासंदर्भात १३ बैठका झाल्या होत्या. “त्या बैठका जयंत पाटील यांच्या घराजवळ झाल्या. तिथल्या सीसीटीव्हीत दादा दिसतील,” असा दावा त्यांनी केला.
विलिनीकरणाचा मुद्दा पुढे केला की काही जणांना त्यावरच बोलायला आवडते, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. नाव न घेता त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. “आम्ही अपघात की घातपात यावर बोलत आहोत, पण काही जण फक्त विलिनीकरणावरच चर्चा करत आहेत,” असे ते म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांनी सह्या केल्याची चर्चा आहे. यावरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. “इतर आमदारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी सह्या का केल्या नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एकूणच, रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेमुळे अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







